Principal’s Message

“नहि ज्ञानेन सदृश्यम पवित्र मिह विद्यते”

ईनामदार श्री देव रामेश्वर कृपा छत्राखाली असलेले पुण्यग्राम ज्याच्या पश्चिमेला अथांग पसरलेल्या अरबी समुद्राच्या उंच उंच निळ्या फुटणाऱ्या लाटांनी फेसाळणारा रुपेरी वाळूचा किनारा, पूर्वेला हिरवीगार वनश्री आणि दरम्यान सागरी महामार्ग क्रमांक चार वर दिमाखात वसलेले ‘आचरा पीपल्स असोसिएशन मुंबई संचलित न्यू इंग्लिश स्कूल आचरा’ हे विद्या संकुल. निसर्गरम्य वातावरणातील हे विद्यालय पाहणारा नक्कीच आकर्षित होईल असे सौंदर्य.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नामवंत संस्था ‘धी आचरा पीपल्स असोसिएशन मुंबई संचलित न्यू इंग्लिश स्कूल आचरा’ या प्रशालेचा परिचय करून देताना मला अतिशय आनंद होतो. तसेच या विद्या संकुलाचा सार्थ अभिमान वाटतो. “नहि ज्ञानेन सदृश्यम पवित्र मिह विद्यते” या सुवचनाचा स्वीकार करून 19 फेब्रुवारी, 1916 पासून अंकुरलेला ‘न्यू इंग्लिश स्कूल आचरा’ हा ज्ञानाचा वटवृक्ष आज वेगवेगळ्या ज्ञानशाखामध्ये विद्यार्थ्यांना अध्ययन करण्यासाठीची संधी देण्यासाठी सदा बहरत आहे.

गेल्या 106 वर्षाच्या कालावधीमध्ये ‘न्यू इंग्लिश स्कूल आचरा’ या प्रशालेत हजारो विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे अध्ययन केले आहे. त्यांना मिळालेली अध्ययन अनुभूती तसेच सुसंस्कार यांच्या शिदोरीवर त्यांनी देश विदेशात विविध व्यवसायामध्ये नावलौकिक मिळवलेला आहे. अर्थात याचे श्रेय त्यांची ज्ञानभक्ती, उच्च विद्या विभूषित गुरुजन आणि निपक्ष, निधर्म, निस्वार्थी, निस्पृहपणे या संकुलाचे संचालन करणारे सन्माननीय संस्थाचालक यांच्याकडे जाते. तत्कालीन जाणकार, सुसंस्कृत दूरदृष्टी असलेल्या सन्माननीय ग्रामस्थांकडे जाते. ज्ञानदानाबरोबरच संस्थेने कोरोनासारख्या असामान्य महामारीच्या काळात प्रशाला कोवीड सुश्रुशा केंद्रासाठी दिली. तर संस्थास्तरावर सेवा करणा-या प्रशालेतील कर्मचा-यांना नियमित वेतन देवून सामाजिक बांधिलकी, मानवतावादी दृष्टीकोन जपलेलाआहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याची  लोकसंख्या सध्या घटती असली तरी आज या संकुलामध्ये पंधराशे विद्यार्थी वेगवेगळ्या ज्ञानशाखमध्ये प्रविष्ट आहेत. सदर विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबरोबरच साहित्य कला, क्रीडा, संगीत,  इत्यादी क्षेत्रातील कलागुणांना चालना देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यासाठी विद्यमान संस्था चालक सदैव सजग, सक्रिय आहेत. त्यांना वेगवेगळ्या कलागुणांची उत्कृष्टता तसेच परिपूर्ण संपन्नतेचा हव्यास आहे. संस्थेच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक ध्येय धोरणांची अंमलबजावणी करणारे उच्च विद्या विभूषित अनुभवी गुरुजन तसेच शिक्षकेतर कर्मचारी सदैव प्रामाणिकपणे कार्यरत आहेत तसेच त्यांना प्रेरणा देणारे आचरा पंचक्रोशीतील सन्माननीय हितचिंतक ग्रामस्थ आहेत. 

आजच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात माहिती, ज्ञान व अनुभूती यांचा प्रचंड स्पोट झाला असलातरी माणुसकी, मानवता धर्माची वाणवा प्रकर्षाने जाणवते. ही उणीव भरून काढण्यासाठी आचऱ्यासारख्या ग्रामीण भागात ‘न्यू इंग्लिश स्कूल आचरा’ येथे  अध्ययनासाठी आणि सुसंस्कारासाठी प्रवेश घेऊन या ठिकाणी शिक्षणासाठी होणाऱ्या प्रामाणिक प्रयत्नांचे साक्षीदार व्हा. विद्यार्थ्यांचा सर्वांगिण, समग्र विकास होण्यासाठी, माध्यमिक शिक्षणानंतरच्या जीवनात योग्य तो पर्याय निवडण्यासाठी दर्जेदार माध्यमिक शिक्षण हे शाळेचे मुख्य उद्दिष्ट आहे तर भावी डिजिटल युगात विद्यार्थ्यांना सक्षम बनविणे हा शाळेचा मानस आहे. या प्रशालेत अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन क्रमिक अभ्यासक्रमाबरोबर विविध कलागुणांमध्ये जिल्हा, विभाग तसेच राज्यस्तरावर विशेष प्राविण्य मिळवलेले आहे. हे प्राविण्य आपणासाठी नक्कीच प्रेरणादायक आहे.

श्री. गोपाळ बी. परब

(मुख्याध्यापक),

न्यू इंग्लिश स्कूल आचरा, तालुका मालवण.