आचरा हे मालवण तालुक्यातील प्रगत व सुसंस्कृत गाव म्हणून ओळखले जाते. जाणकार व सुसंस्कृत ग्रामस्थांनी ‘न्यू इंग्लिश स्कूल आचरा’ या प्रशालेची स्थापना सन १९१६ मध्ये केली. न्यू इंग्लिश स्कूल आचरा या प्रशालेची स्थापना त्रिमुर्तींनी केली. ही त्रिमुर्ती म्हणजे कै. ते. एन. करंजे, कै. मंगेश कानविंदे आणि कै. मरहुम मोहम्मदअली कमरुद्दीन काझी या तिन्ही सामाजिक कार्यकर्त्यांच्या आडनावात ‘क‘ हे अक्षर आहे. याचा अर्थ कल्पक योजनेतून ग्रामीण भागात ज्ञानदान करण्यासाठी प्रशालेची स्थापना केली आणि त्यामुळे सामान्य माणसाला सुशिक्षित होणे, शिक्षण घेणे शक्य झाले.
आचरा हे गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यात अरबी सुमुद्राकाठचं समृद्ध खेड, गावच्या एका टोकाला विशाल समुद्र आहे. त्याचप्रमाणे हिरवीगार वनराई आहे. जांभ्या दगडावर कष्ट करुन तयार केलेली आंबा-काजूच्या बागा पूर्वजांच्या आठवणीची त्याच हिरव्यागार झाडांच्या सावलीत छोट्याशा इमारतीत या गावात सुरुवातीला प्रथम इंग्रजी तिसरीपर्यंत वर्ग सुरु करण्यात आले. १९२१ साली पाचवी पर्यंत वर्ग सुरु झाले आणि १९४५ साली इंग्रजी सातवी म्हणजे त्यावेळचा मॅट्रिकचा वर्ग सुरु करण्यात आला. अशाप्रकारे अगदी टप्प्याटप्प्याने शैक्षणिक वातावरण सुरु झाले. सुरुवातीला अगदी छोट्या स्वरुपात व मार्यादित शैक्षणिक कर्या करणारी ‘धी आचरा पीपल्स असोसिएशन’ या शिक्षण संस्थेचा आज वटवृक्ष झाला असून हा वटवृक्ष आता चांगलाच बहरत आहे. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षणाची व महाविद्यालयीन शिक्षणाची सोय आचरा सारख्या ग्रामीण भागात आहे. संस्था संचालकांच्या प्रयत्नांमुळे कला व वाणिज्य या दोन शाखांचे महाविद्यालयीन शिक्षण सुरु आहे. संस्थेच्या शैक्षणिक कार्याला आज १०० वर्षे पूर्ण झाली असून शतकोत्तर यशस्वीरित्या वाटचाल सुरु आहे. ती सुद्धा अनेक नवनवीन चांगले उपक्रम राबवित.
आचरा हायस्कूलला फार मोठी उज्ज्वल परंपरा लाभली आहे. मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु माननीय डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी या शाळेत सातवीची शिष्यवृत्ती ची परीक्षा दिली. आज ते उच्च पदावर कार्यरत आहेत. सन २००३ मध्ये मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु असताना शाळेला भेट दिली. ज्या वर्गात परीक्षेला बसले होते त्या वर्गाला मनोमन नमस्कार केला. आपल्या या शाळेची उज्ज्वल यशाची परंपरा व शैक्षणिक प्रगती पाहून ते म्हणाले माझ्याकडून जे शक्य आहे ते देण्यास केव्हाही तयार आहे. त्यांच्या या पवित्र वाक्यातून आचरा विद्यानगरीत महाविद्यालय शिक्षण सुरु झाले आहे.
दानशूरांच्या देणगीतून दोन भव्य इमारती बांधण्यात आल्या. सन १९८१ मध्ये ग्रामीण भागातील मुलांना उच्च शिक्षण मिळावे या उद्देशाने इयत्ता अकरावी आणि सन १९८२ मध्ये इयत्ता बारावी कला शाखेचे वर्ग सुरु करण्यात आले. या वर्गाचा लाभ आचरा, वायंगणी, हडी, त्रिंबक, पळसंब, आडवली, मुणगे, हिंदळे, पोयरे, खुडी या गावांतील मुले घेत आहेत. उच्च माध्यमिक वर्गाची निकालाची परंपरा पाहून सन २००३ मध्ये वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय सुरु करण्यात आले. या शाखेला चांगला प्रतिसाद मिळत असून इयत्ता बारावीच्या वर्गात १५२ मुले शिक्षण घेत आहेत.
दोन भव्य स्वतंत्र इमारती
ल.बा. सांबारी कनिष्ठ कला महाविद्यालयाच्या इमारतीसाठी डॉ. मोहनराव कंटक व सौ नीलिमा कंटक या पितृभक्त दाम्पत्याकडून भरीव ५ लाखाची देणगी देण्यात आली. त्याच प्रमाणे संस्था पदाधिकारी व देणगीदारांच्या माध्यमातून १२ लाखाचा खर्च करुन प्रशस्त इमारत बांधण्यात आली.
फातिमाबी अब्दुल्ला काझी कनिष्ठ महाविद्यालयाची भव्य इमारत आज विद्यानगरीत साकारली आहे. आचरा गावचे सुपुत्र डॉ. यु. ए. काझी यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ वाणिज्य महाविद्यालयाच्या इमारतीसाठी १० लाख रुपयांची भरीव देणगी देऊन हे पवित्र विद्यामंदिर उभारण्याचे फार मोठे कार्य केले. त्यांच्या सहकार्यातून वाणिज्य महाविद्यालय सुरु झाले आहे. अशाप्रकारे आज आचरा गावच्या विद्यानगरीत सात स्वतंत्र इमारती उभ्या असून सुसज्ज अशा बारा वर्गात आज अध्यापनाचे कार्य सुरु आहे. स्वतंत्र प्रयोगशाळा, स्वतंत्र वाचनालय, भव्यदिव्य सभागृह, भव्य प्रशस्त पटांगण आदी अनेक सुविधा विद्यानगरीत आहेत.
आमच्या शाळेला सुविधा, मेहनती आणि विविध क्षेत्रात अग्रेसर असा प्रशिक्षित शिक्षक वर्ग लाभला आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यातील सुप्त गुणांचा विकास व्हावा यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. पाठांतर स्पर्धा, काव्य वाचन स्पर्धा, काव्यलेखन स्पर्धा, कथालेखन, प्रश्नमंजुषा, गीत गायन, टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनविणे, पर्यावरण जनजागृती, वृक्षदिंडी, ग्रंथदिंडी, भित्तीपत्रके, व्यसनमुक्ती निबंध स्पर्धा, शालाबाह्य स्पर्धा, यामध्ये विविध विद्यार्थी सहभागी होतात. त्याच प्रमाणे वृत्तपत्रासाठी स्वतंत्र लेखन करण्यासाठी योग्य मार्गदर्शन, पत्राद्वारे लेखक भेट आदी अनेक उपक्रम राबविले जातात.
क्रीडा स्पर्धेत उत्तुंग भरारी, चित्रकलास्पर्धेत चांगले यश मिळवले जाते. क्रीडा क्षेत्रात सतत चांगले यश गेली चार वर्षे आमच्या प्रशालेतील विद्यार्थी मिळवत आहेत ते राज्य पातळीपर्यंत क्रीडा स्पर्धांसाठी सहभागी झाले आहेत.